हरवला मोबाईल... पण सापडली माणुसकी! कलियुगातही प्रामाणिकपणाचा दिवा तेवत ठेवणाऱ्या ॲड. भूषण एडके यांना सलाम!
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा/चाळीसगाव : आजच्या काळात एखादी मौल्यवान वस्तू सापडली की ती आपल्या मालकीची समजण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. मात्र या स्वार्थाच्या गर्दीतही प्रामाणिकपणा, माणुसकी आणि दुसऱ्याच्या हक्काची जाणीव जपणारी माणसं अजूनही समाजात आहेत, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय धारेश्वरच्या प्रवासादरम्यान आला.
धारेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा हा प्रवास सुरुवातीला श्रद्धा, निसर्ग आणि आनंदाने भरलेला होता. बनोटीच्या पुढे धरणाजवळ वाहन उभे करून पुढचा तब्बल ५ ते ६ किलोमीटरचा खडतर रस्ता कुटुंबाला पायी पार करावा लागला. सोबत वयोवृद्ध आई-वडील असल्याने प्रत्येक पाऊल जड जात होते. कधी हाताचा आधार देत, तर कधी झाडाखाली विश्रांती घेत कुटुंबाने अखेर धारेश्वर गाठले.
समोर सुमारे ३०० फुटांवरून कोसळणारा शुभ्र धबधबा, हिरवाईने नटलेला परिसर आणि कपारीत शांतपणे वसलेली महादेवाची पिंड पाहताच सारा थकवा नाहीसा झाला. दर्शन घेतल्यानंतर आणि निसर्गाचा आनंद लुटल्यानंतर कुटुंब पुन्हा परतीच्या वाटेला लागले.
मात्र सुमारे चार किलोमीटर चालून आल्यानंतर मुलीच्या लक्षात आले की तिचा मोबाईल हरवला आहे.
ज्या ज्या ठिकाणी कुटुंब थांबले होते, तिथे पुन्हा जाऊन शोधाशोध करण्यात आली. मात्र मोबाईल मिळाला नाही. संध्याकाळ होत आली होती, आई-वडील थकले होते आणि जंगलातील खडतर रस्ता पुन्हा पार करणेही अवघड होते. अखेर निराश मनाने कुटुंब पाचोऱ्याच्या दिशेने निघाले.
गाडीत बसल्यानंतर मुलगी वडिलांच्या मोबाईलवरून स्वतःच्या नंबरवर वारंवार फोन करत होती. आशा जवळपास संपली होती...
पण अचानक फोन लागला!
पलीकडून आवाज आला—“मोबाईल सुरक्षित आहे.”
त्या काही शब्दांनी मुलीच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला. समोरील व्यक्तीने सांगितले, “काळजी करू नका. आम्ही चाळीसगावचे आहोत. बनोटी रस्त्यावर येत आहोत. तुम्ही तिथेच थांबा.”
थोड्याच वेळात चाळीसगावचे ॲड. भूषण त्र्यंबक एडके बनोटी येथे आले आणि त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता मोबाईल त्याच्या मालकाच्या हातात सुरक्षितपणे परत दिला.
ही घटना मोबाईल परत मिळाल्यापुरती मर्यादित नाही. हा एका प्रामाणिक माणसाने संपूर्ण समाजाला दिलेला मोठा संदेश आहे.
आजच्या काळात सापडलेली वस्तू परत करण्यासाठी मन मोठे असावे लागते. कारण मोबाईलची किंमत पैशांत मोजता येते; पण एखाद्याचा विश्वास जपण्याची किंमत पैशांत मोजता येत नाही.
धारेश्वरच्या कपारीतील महादेवाच्या पिंडीचे दर्शन या कुटुंबाने घेतले; पण परतीच्या वाटेवर ॲड. भूषण एडके यांच्या रूपाने त्यांना माणुसकीचे जिवंत दर्शन घडले.
धबधब्याचे पाणी वाहून जाईल, प्रवासाची आठवणही काळाबरोबर फिकी होईल; पण एका अनोळखी व्यक्तीने दाखवलेला प्रामाणिकपणा आयुष्यभर लक्षात राहील.
ॲड. भूषण एडके यांनी मोबाईल परत केला, पण त्यासोबत त्यांनी समाजाला एक अमूल्य शिकवण दिली—
“सापडलेली वस्तू आपली नसते; ती ज्याची आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवणे हीच खरी माणुसकी.”
अशा प्रामाणिक व्यक्तींच्या कृती समाजात विश्वास निर्माण करतात. त्यांची ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी ठरावी आणि सापडलेल्या वस्तू प्रामाणिकपणे परत करण्याची संस्कृती समाजात रुजावी, हीच अपेक्षा.
ॲड. भूषण त्र्यंबक एडके (चाळीसगाव) यांना मनापासून मानाचा मुजरा! त्यांच्या प्रामाणिकपणाला आणि माणुसकीला सलाम!
— उमेश महाजन
राज्य उपाध्यक्ष, औषध निर्माण अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य
मो. 9421513739
Comments
Post a Comment