शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटवा आठ दिवसांत कारवाई न झाल्यास अभाविपचे तीव्र आंदोलन
जळगाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाहेरील कचरा संकलन केंद्र मागील अनेक दिवसांपासून सुरू असून, या ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीयुक्त वातावरणाचा थेट परिणाम संस्थेतील विद्यार्थ्यांवर होत असून, विद्यार्थ्यांना दुर्गंधीतच वर्गात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच याच परिसरात विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा खावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शैक्षणिक संस्थेच्या परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण असणे आवश्यक असताना संस्थेच्या अगदी बाहेरच कचरा संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. कचऱ्याची नियमित विल्हेवाट आणि परिसराची स्वच्छता याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महापौर व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. कचरा संकलन केंद्र तातडीने बंद करून तेथील कचरा हटवावा, परिसराची स्वच्छता करावी तसेच भविष्यात शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अशा प्रकारे कचरा संकलन होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाहेरील कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घ्यावे लागत असून, त्याच वातावरणात त्यांना जेवणाचा डबा खावा लागत आहे. हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. महानगरपालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हे कचरा संकलन केंद्र तातडीने हटवावे.”
प्रदेश कार्यकारिणी सदस्य वरद पांढारकर म्हणाले, “पुढील आठ दिवसांत कचरा संकलन केंद्र बंद करून परिसराची स्वच्छता न केल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल.”
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा उद्भवणाऱ्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आला आहे.यावेळी अजित केंद्रे,आयुष पाचपोर,मयुरी जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment