गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची पहाटे धडक; ५५ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई.....हद्दपार सराईत गुन्हेगार जेरबंद; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील, अवैध दारूविक्रीवरही धाड*
राजेंद्र खैरनार, पाचोरा मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज
पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पहाटे ३.०० ते ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर व ग्रामीण हद्दीत व्यापक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले.
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी व झडती घेण्यात आली.
५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई
कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तब्बल ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, याबाबत त्यांना कडक शब्दांत समज देण्यात आली.
हद्दपार गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई
या कारवाईदरम्यान पाचोरा शहरातून हद्दपार असलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
११ अजामीनपात्र वॉरंटची तामिली
न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील एकूण ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) तामील करण्यात आले. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या आरोपींवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
अवैध दारूविक्रीवर धाड
कॉम्बिंग ऑपरेशनसोबतच अवैध धंद्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. प्रोहिबिशन रेड अंतर्गत बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांवर धाड टाकून २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोवंश वाहतूक व बेकायदेशीर शस्त्राविरुद्धही कारवाई
मोहिमेदरम्यान अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी एक कारवाई, तसेच आर्म्स ॲक्टअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सवात शांतता भंग करणाऱ्यांची गय नाही
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी घेतलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. उत्सवाच्या काळात शांतता भंग करणारे, कायदा हातात घेणारे अथवा अवैध धंदे चालविणाऱ्या असामाजिक घटकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
शहर व ग्रामीण भागात अशाच प्रकारे धडक तपासणी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि पेट्रोलिंगची कारवाई यापुढेही सुरूच राहणार असून, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा पोलिसांनी कंबर कसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment