दिव्यांगांचे अनुदान बंद होण्यामागे नेमके कोण जबाबदार? कागदपत्रांतील त्रुटी तपासा; अफवांवर विश्वास ठेवू नका!संजय गांधी कार्यालयाला दोष देण्यापूर्वी आधार, बँक खाते, UDID, KYC आणि हयातीचा दाखला तपासा; दिव्यांग मित्र परमेश्वर भाऊंचा स्वानुभवातून महत्त्वपूर्ण संदेश
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांचे संजय गांधी निराधार अनुदान गेल्या चार, सहा, आठ महिन्यांपासून किंवा काहींचे वर्षभरापासून बंद असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र, अनुदान बंद झाले म्हणून थेट संजय गांधी कार्यालयाला दोष देण्याऐवजी संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची व बँक खात्याची स्थिती तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर भाऊ यांनी केले आहे.
शासकीय योजनांचे अनुदान DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने आधार, बँक खाते, NPCI, UDID, दिव्यांग प्रमाणपत्र, KYC तसेच इतर कागदपत्रांमध्ये तफावत असल्यास अनुदानाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
अनुदान अडकण्याची संभाव्य प्रमुख कारणे
लाभार्थ्यांनी खालील बाबी तपासून घेणे आवश्यक आहे—
- आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणे.
- बँक खाते आधारशी लिंक अथवा NPCI/DBT सक्रिय नसणे.
- UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्राशी आवश्यक आधार/मोबाईल तपशील अद्ययावत नसणे.
- UDID संबंधित KYC प्रलंबित असणे.
- आधार, बँक पासबुक आणि दिव्यांग प्रमाणपत्रावरील नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत असणे.
- कागदपत्रांवरील पत्ता चुकीचा किंवा जुना असणे.
- आधार, UDID आणि दिव्यांग प्रमाणपत्रावरील जन्मतारखांमध्ये तफावत असणे.
- विविध कागदपत्रांवर वेगवेगळे मोबाईल नंबर नोंदलेले असणे.
- हयातीचा दाखला ऑनलाइन अद्ययावत नसणे.
- बँक KYC पूर्ण नसणे.
मग लाभार्थ्यांनी काय करावे?
अनुदानात अडचण येत असल्यास संबंधित लाभार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कागदपत्रांतील त्रुटी दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.
आधार केंद्रात जाऊन आधार अपडेट व मोबाईल लिंक करून घ्यावा.
बँकेत जाऊन आधार लिंक, NPCI/DBT आणि KYCची स्थिती तपासून घ्यावी.
जिल्हा रुग्णालयात आवश्यकतेनुसार UDID कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्रातील माहिती अद्ययावत करून घ्यावी.
नाव, पत्ता, जन्मतारीख व इतर तपशीलांमध्ये तफावत असल्यास ती अधिकृत कागदपत्रांनुसार दुरुस्त करून घ्यावी.
तसेच हयातीचा दाखला ऑनलाइन अद्ययावत आहे की नाही, याची खात्री करावी.
'माझेच अनुदान पाच महिने बंद होते' — परमेश्वर भाऊंचा स्वानुभव
दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर भाऊ यांनी स्वतःचा अनुभव सांगताना नमूद केले की, त्यांच्या कागदपत्रांमध्ये जन्मतारखेबाबत तफावत होती. आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्डवर वेगवेगळ्या जन्मतारखा असल्याने त्यांचे अनुदान सुमारे पाच महिन्यांपासून बंद होते.
ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन आवश्यक दुरुस्त्या करून घेतल्या. त्यानंतर पाचोरा येथील संजय गांधी कार्यालयात अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. परिणामी प्रलंबित असलेले अनुदान एकत्रितपणे त्यांच्या खात्यात जमा झाले.
'कार्यालयाने योजना बंद केली' अशा अफवांवर विश्वास ठेवू नका
दिव्यांग बांधवांनी केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून संजय गांधी कार्यालयाबाबत गैरसमज करून घेऊ नये. अनुदानासंदर्भात अडचण असल्यास प्रथम आपल्या कागदपत्रांची व बँक खात्याची स्थिती तपासावी आणि त्यानंतर संबंधित कार्यालयाकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परमेश्वर भाऊ यांनी पाचोरा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. तहसीलदार श्री. बनसोडे साहेब, नायब तहसीलदार राजपूत मॅडम, परदेशी आप्पासाहेब, पाटील भाऊसाहेब, जडे भाऊसाहेब तसेच सर्व संबंधित कर्मचारी दिव्यांग नागरिकांना सन्मानाने वागणूक देत असून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करतात, असा त्यांचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांसाठी कळकळीचे आवाहन
अनुदान बंद झाले असल्यास घाबरून जाऊ नका. आपली कागदपत्रे तपासा, त्रुटी दुरुस्त करा आणि संबंधित कार्यालयाकडून मार्गदर्शन घ्या. चुकीच्या अफवांमुळे अधिकारी किंवा कार्यालयाची बदनामी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी.
या महत्त्वपूर्ण माहितीचा अधिकाधिक दिव्यांग बांधवांपर्यंत प्रसार करून, कोणाचेही अनुदान केवळ कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रलंबित राहू नये, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अडचण असल्यास संपर्क : परमेश्वर भाऊ – 7620197391 / 9270808134
दिव्यांग मित्र परमेश्वर भाऊ
दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता समिती
अध्यक्ष – व्यंग सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य
Comments
Post a Comment