कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल; ए.व्ही. जाधव यांना महाराष्ट्र इन्स्पायर अवॉर्ड २०२६
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कार्य करून कृषी विकासासाठी योगदान देणारे पाचोरा येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. अशोक विश्राम जाधव (ए.व्ही. जाधव) यांचा राष्ट्रीय स्तरावरील ‘महाराष्ट्र इन्स्पायर अवॉर्ड २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. नाशिक येथे १९ ऑगस्ट २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कृषी क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, शेतकऱ्यांसाठी केलेले मार्गदर्शन तसेच कृषीविषयक उपक्रमांमध्ये दिलेले योगदान याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सेवानिवृत्तीनंतरही कृषी क्षेत्राशी असलेली त्यांची नाळ कायम ठेवत शेतकरी व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ते कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री मा. सौ. स्मिता प्रभू, कृषी संचालक (सेवानिवृत्त) फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय, पुणे, मा. डॉ. कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक, मा. श्री. रविंद्र माने, प्रकल्प संचालक आत्मा, नाशिक, मा. श्री. अभिमन्यू काशीद, उपजिल्हाधिकारी (महसूल), ठाणे, मा. सौ. रूपाली भालके, कृषिमंच नाशिकचे अध्यक्ष श्री. भूषण निकम तसेच कृषिमंच नाशिकच्या संचालिका मा. सौ. रोहिणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री. ए.व्ही. जाधव यांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या सन्मानामुळे पाचोरा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना यामुळे निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
श्री. अशोक विश्राम जाधव यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कृषी क्षेत्रातील सहकारी, शेतकरी, मित्रपरिवार तसेच पाचोरा तालुक्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment