हटकेश्वर महादेव मंदिराचा तृतीय वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न; अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भावपूर्ण सांगता
राजेंद्र खैरनार पाचोरा मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : गुरुदत्त नगर, कृष्णापुरी, पाचोरा येथील हटकेश्वर महादेव मंदिराचा तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय वातावरणात नुकतीच सांगता झाली. जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या कृपाशीर्वादाने व मठाधिपती ह.भ.प. गोविंद महाराज पाचोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दि. १४ ते २१ ऑगस्टदरम्यान झालेल्या या सप्ताहात ह.भ.प. राधाकिशोरी महाराज, ह.भ.प. नारायण महाराज भडणेकर, ह.भ.प. अमृत महाराज गाढे (बेटावद), ह.भ.प. महंत समाधान महाराज भोजेकर (जळगाव), ह.भ.प. गणेश महाराज काचोळे, ह.भ.प. प्रियंका ताई काचोळे यांचे जुगलबंदी कीर्तन, ह.भ.प. गजाननजी महाराज वरसाडेकर, ह.भ.प. अरुण महाराज जामठी तसेच मठाधिपती ह.भ.प. गोविंद महाराज पाचोरेकर यांच्यासह विविध कीर्तनकारांनी भक्ती, नामस्मरण व अध्यात्माचा संदेश दिला.
दररोज सकाळी ५ ते ६ वाजता सामुदायिक काकडा आरती तसेच सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ घेण्यात येत होता. त्यामुळे संपूर्ण कृष्णापुरी परिसरात पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
भावपूर्ण वातावरणात सप्ताहाची सांगता
दि. २१ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता झाली. यावेळी सकाळपासून सुरू असलेले महाराजांचे कीर्तन सुमारे साडेअकरा ते पावणेबारापर्यंत रंगले. कीर्तनातून उपस्थित भाविकांना नामस्मरण, भक्ती, एकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.
सांगता प्रसंगी मठाधिपती ह.भ.प. गोविंद महाराज पाचोरेकर यांनी गुरुदत्त नगर, कृष्णापुरी परिसरातील सर्व भाविक भक्त, आयोजक मंडळ व सेवेकऱ्यांचे भरभरून कौतुक केले. एवढ्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी दाखविलेली एकजूट आणि सहकार्य पाहून समाधान व्यक्त करत, “अशी एकी आणि आपुलकी आपल्या ठिकाणीही असावी,” अशा भावना महाराजांनी व्यक्त केल्या.
रात्री केक कापून हटकेश्वर महादेवांचा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा
२१ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता हटकेश्वर महादेव मंदिर परिसरात तृतीय वर्धापन दिनाचा विशेष सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. हटकेश्वर महादेव मंदिर समितीचे सदस्य, गुरुदत्त नगर परिसरातील नागरिक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित भाविक भक्तांच्या साक्षीने केक कापून हटकेश्वर महादेवांचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भक्तांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे वर्धापन दिनाचा हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला. मंदिर समिती सदस्य व सर्व भाविक भक्तांनी एकत्र येत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात हा वर्धापन दिन साजरा केला.
देणगीदार, सेवेकर,व नगरसेवक अशोक आप्पा पाटील, विनोद सुभाष पाटील , प्रदीप भाऊ वाघ या या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला
सप्ताह यशस्वी करण्यासाठी आर्थिक व विविध प्रकारे सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा तसेच सेवेकऱ्यांचा पेढे व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे पुढील वर्षी धार्मिक सप्ताहासाठी सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला. धार्मिक कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
सत्कार समारंभाची सांगता झाल्यानंतर दुपारी १२ वाजेनंतर पंचक्रोशीतील विविध गावांमधून आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कृष्णापुरीसह परिसरातील तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा भक्तिभावाने आस्वाद घेतला. यावेळी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेत आयोजक मंडळाच्या नियोजनाचे कौतुक केले. महाप्रसादाच्या व्यवस्थेसाठी सेवेकरी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
या संपूर्ण सप्ताहात कृष्णापुरी, बाहेरपुरा, पाचोरा, वेरुळी, मोंढाळे, गोराडखेडे, बिल्दी, साजगाव, खेडगाव, पहाण, वडगाव टेक, जारगाव, अंतुर्ली, तारखेडा, निंभोरा आदी परिसरातील विविध भजनी मंडळांनी साथसंगत करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
हटकेश्वर महादेव मंदिर समिती, गुरुदत्त नगर, कृष्णापुरी, पाचोरा यांच्या वतीने आयोजित या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सर्व भाविक भक्त, भजनी मंडळे, देणगीदार, सेवेकरी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
अखंड हरिनाम, कीर्तन, भजन, संतविचार आणि वर्धापन दिनाच्या उत्साहामुळे कृष्णापुरी परिसरात भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.
Comments
Post a Comment