महागाईच्या झळा; रोजंदारी वाढविण्याची मागणीकामगारांना ७५०, कंत्राटी कामगारांना ९०० रुपये रोज देण्याची मागणी
पाचोरा : जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे. तेल, साखर, धान्य, गॅस, कपडे, शैक्षणिक साहित्य, आरोग्य व प्रवासाचा खर्च वाढल्याने गोरगरीब कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. या पार्श्वभूमीवर महागाईला तोंड देण्यासाठी कामगारांच्या रोजंदारीत वाढ करण्याची मागणी पाचोरा येथील गणेश जनार्दन शिंदे यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. किराणा, कापड, फर्निचर, हॉटेल, मॉल, गॅरेज, सफाई, घरकाम, बांधकाम, हमाली यासह विविध असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांना आठ तासांच्या कामासाठी किमान ७५० रुपये रोजंदारी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांसाठी किमान ९०० रुपये रोजंदारी निश्चित करावी. तसेच कामगारांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळण्यासाठी पीएफ आणि ईएसआयची सुविधा कायमस्वरूपी लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महागाईच्या तुलनेत कामगारांचे उत्पन्न वाढले नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर परिणाम होतो. त्यामुळे महागाईचा विचार करून किमान रोजंदारीत वाढ करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गणेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment