“रक्षण मागणारी बहीण नव्हे, रक्षण करणारी बहीण व्हायचंय!”; खाकी वर्दीतील ‘राखी’चं एपीआय कल्याणी वर्मा मॅडम यांचं भावस्पर्शी वचन...
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पिंपळगाव हरे.(पाचोरा तालुका) : रक्षाबंधन म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि संरक्षणाचं अतूट नातं. मात्र, या नात्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत “रक्षण मागणारी बहीण न राहता, रक्षण करणारी बहीण व्हायचंय”, असा हृदयस्पर्शी संदेश पिंपळगाव-हरेश्वर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिला आहे.
रक्षाबंधन हा केवळ रक्ताच्या नात्यांचा सण नसून, विश्वास, माणुसकी, आपुलकी आणि परस्पर संरक्षणाच्या भावनेने माणसांना जोडणारा पवित्र धागा आहे, अशी भावना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केली आहे.
लहानपणी राखी पौर्णिमेला भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्याकडून संरक्षणाचे वचन घेणारी बहीण मोठी झाल्यावर समाजातील वास्तवाकडे पाहते आणि तिच्या मनात एक वेगळीच जाणीव निर्माण होते. “रक्षण मागणारी बहीण न राहता, रक्षण करणारी बहीण व्हायचे,” ही भावना मनात घेऊन खाकी वर्दीच्या माध्यमातून समाजसेवेची जबाबदारी स्वीकारल्याचे कल्याणी वर्मा यांनी आपल्या संदेशातून अधोरेखित केले आहे.
“जोपर्यंत ही वर्दी माझ्या अंगावर आहे, तोपर्यंत तुमच्या सुरक्षेची राखी माझ्या हातावर कायम राहील,” या शब्दांत त्यांनी आपल्या कार्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला त्यांच्या शुभेच्छांना केवळ सणाचा संदेश न राहता, कर्तव्य, सुरक्षा आणि सामाजिक विश्वासाची भावनिक शपथ लाभली आहे.
पिंपळगाव हरे हद्दीतील प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानत त्यांनी समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे. रस्त्यावरचा सामान्य वाटसरू असो, शेतात कष्ट करणारा शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक असो, गावातील पोलीस पाटील असो, आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्य मांडणारा पत्रकार असो, समाजासाठी झटणारा कार्यकर्ता असो, जनतेचे नेतृत्व करणारा लोकप्रतिनिधी असो किंवा रात्रंदिवस खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणारे पोलीस सहकारी अंमलदार असोत—हे सर्वजण आपल्या मोठ्या कुटुंबाचा भाग असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
कर्तव्य बजावताना समाजातील प्रत्येक स्तरातून मिळणारी साथ, विश्वास आणि सहकार्य याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. खाकी वर्दी ही केवळ अधिकाराची ओळख नसून, सामान्य नागरिकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, हा संदेश त्यांच्या शुभेच्छांमधून प्रकर्षाने जाणवतो.
रक्षाबंधनाच्या पवित्र धाग्याला त्यांनी माणुसकीच्या नात्याशी जोडत, “माझी खाकी वर्दी तुमच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहील,” असे भावनिक आश्वासन दिले आहे. त्यामुळे एका बहिणीने भावाच्या मनगटावर बांधलेल्या राखीपेक्षा वेगळी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी खाकी वर्दीवर बांधलेली जबाबदारीची राखी त्यांच्या संदेशातून पाहायला मिळते.
या रक्षाबंधनानिमित्त पिंपळगाव-हरे हद्दीसह सर्व नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे. प्रत्येक कुटुंबात आनंद, प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेचे वातावरण कायम राहावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा एपीआय श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांनी दिल्या आहेत.
राखीचा धागा मनगटावर असतो; पण संरक्षणाची भावना हृदयात असते. आणि खाकी वर्दीतून हीच भावना जपणाऱ्या कल्याणी वर्मा मॅडम यांच्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छांनी नात्यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा एक सुंदर धागा जोडला आहे.
Comments
Post a Comment