८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा; अन्यथा प्रारूप मतदार यादीत नाव राहणार नाहीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आवाहन; १७ ऑगस्टला प्रारूप, १९ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक सत्य शोध न्युज
८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा; अन्यथा प्रारूप मतदार यादीत नाव राहणार नाही
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आवाहन; १७ ऑगस्टला प्रारूप, १९ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
मुंबई / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाला वेग आला असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सुपूर्द करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, गणना अर्ज भरून स्वाक्षरीसह सादर करणाऱ्या मतदारांची नावे दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
ज्या पात्र मतदारांची नावे प्रारूप यादीत आढळून येणार नाहीत किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करावयाची असेल, त्यांना दि. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८, तर चुकीची किंवा अपात्र नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील. अंतिम मतदार यादी दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची माहिती अथवा खोटी घोषणा केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
तसेच, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ व २३ अंतर्गत मतदार यादीतील नाव समाविष्ट करणे अथवा दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू राहते. कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पात्र नागरिकांना विहित नमुन्यात अर्ज करून मतदार यादीत नाव समाविष्ट अथवा दुरुस्त करता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
राज्यातील सर्व पात्र नागरिकांनी निर्धारित मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपल्या मतदानाच्या अधिकाराची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment