पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर; ९ गावांतील पुलांवरून पाणी, ३ गावांचा संपर्क तुटला – गिरणा धरणातून विसर्ग सुरू


राजेंद्र खैरनार | पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज 
पाचोरा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तहसील प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार तालुक्यात सरासरी ५६.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून एकूण ३९४ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कुऱ्हाड येथे सर्वाधिक ६८ मि.मी., वरखेडी येथे ६४ मि.मी. तर पाचोरा येथे ६२ मि.मी. पाऊस झाला आहे.

सततच्या पावसामुळे कासमपुरा, पिंपळगाव बु., नाचणखेडी, लोहारी बु., पिंप्री बु., चिंचपुरे, राजुरी, सामनेर आणि वाघुलखेडा या नऊ गावांमधील पुलांवरून पाणी वाहत असून वाहतूक धोकादायक बनली आहे. नाचणखेडी येथे लेंडी नाल्याचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूरस्थितीमुळे पिंपळगाव बु.–पिंपळगाव पुरा, लोहारी बु.–लोहारी खुर्द तसेच वाघुलखेडा–खडकदेवळा या मार्गांवरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे. प्रशासनाने या भागांतील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

अतिवृष्टीमुळे कृष्णपुरी (३), खडकदेवळा (१) आणि लोहारा (४) अशा एकूण ८ घरांची अंशतः पडझड झाली आहे. तसेच नाचणखेडा आणि पाचोरा शहरातील मिळून ७ घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, गिरणा मोठा प्रकल्प ९७.०६ टक्के भरल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. आज (३१ जुलै) दुपारी १ वाजता गिरणा धरणाचे दरवाजे उघडून सुरुवातीला १,००० ते २,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या १० ते १५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तहसील कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार नदीकाठच्या नागरिकांनी पशुधन, शेतीमाल, मोटारपंप व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा वाढता जोर आणि धरणातील वाढता पाणीसाठा लक्षात घेता पाचोरा तालुक्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..