ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन


जळगाव, दि. २९ जुलै :वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात **स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील** यांनी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच मोबाईलमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले. मजबूत पासवर्डचा वापर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवणे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष घडलेल्या सायबर फसवणुकीच्या उदाहरणांमुळे उपस्थितांना संभाव्य धोके ओळखणे आणि त्यापासून बचाव करण्याचे प्रभावी मार्ग समजले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी अशा जनजागृती उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती वाढण्यास मोलाची मदत झाली.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..