आ.किशोर आप्पा पाटील घटनास्थळी दाखल; मुसळधार पावसाने पाचोरा शहरातील जनता वसाहत-वाल्मिकी नगर जलमय, नागरिकांचे मोठे नुकसान
राजेंद्र खैरनार | पाचोरा मुख्य संपादक सत्य शोध न्युज 9096237788
पाचोरा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनता वसाहत आणि वाल्मिकी नगर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अल्पावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याने घरगुती वापरातील साहित्य, फर्निचर, किराणा माल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर महत्त्वाच्या वस्तूंचे नुकसान झाले. अनेक नागरिकांना घरातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तासन्तास प्रयत्न करावे लागले. तर काही व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याची वेळ आल्याने आर्थिक फटका बसला.
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत परिसरातील नाले व गटारींची वेळेवर साफसफाई होत नसल्याचा आरोप केला. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न झाल्याने दरवर्षी अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या समवेत तहसीलदार विजय बनसोडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, नगराध्यक्षा सुनिता ताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर तसेच नगरसेविका वर्षाताई ब्राह्मणे उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपली व्यथा आणि झालेल्या नुकसानीची माहिती लोकप्रतिनिधी व प्रशासनासमोर मांडली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment