नगरदेवळा पोलिसांची तत्परता; तीन तासांपासून हरवलेल्या चिमुकल्याला सुखरूप आईच्या स्वाधीन...!पोलीस कर्मचारी दिनेश पाटील व माजिद पठाण यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला...
राजेंद्र खैरनार | पाचोरा
नगरदेवळा परिसरात हरवलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला अवघ्या काही तासांत शोधून त्याच्या आईच्या स्वाधीन करत नगरदेवळा पोलिसांनी संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडविले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश समाधान शेजवळ (वय ३ वर्षे, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हा बालक नगरदेवळा गावात आपल्या कुटुंबीयांपासून विभक्त झाला होता. तब्बल तीन तासांपासून तो हरवलेला असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच नगरदेवळा पोलिस मदत केंद्राचे पोलीस शिपाई दिनेश पाटील व पोलीस हवालदार माजिद पठाण यांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. नगरदेवळा गावासह आसपासच्या परिसरात कसून चौकशी करून बालकाच्या पालकांचा शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना चिमुकल्याची आई कावेरी समाधान शेजवळ यांचा शोध लागला.
ओळख पटवून सर्व खातरजमा केल्यानंतर यश याला त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. आपल्या मुलाला सुरक्षित पाहताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पोलिसांच्या या मानवतावादी कार्याबद्दल कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नगरदेवळा पोलिसांनी दाखविलेली तत्परता, जबाबदारीची जाणीव आणि संवेदनशीलता ही पोलिस दलाच्या जनहितैषी भूमिकेची प्रचिती देणारी ठरली आहे. परिसरातील नागरिकांनीही या कार्याचे स्वागत करत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
"पोलिसांच्या वेगवान हालचालीमुळे हरवलेला चिमुकला सुखरूप सापडला; नगरदेवळा पोलिसांच्या सतर्कतेला नागरिकांचा सलाम!" 🚔👏
Comments
Post a Comment