"योगातून निरोगी भारताचा संदेश; कै. पि. के. शिंदे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा"विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध योगासनांनी दिला आरोग्याचा मंत्र
पाचोरा | प्रतिनिधीशारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज (दि. २१ जून) कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष उपक्रमात सौ. सा. प. शिंदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व योगगुरू श्री. सु. ना. पाटील सर, सौ. सुवर्णा महाजन मॅडम आणि राहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि शारीरिक व्यायामाचे प्रकार सादर केले. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योगासनांचा सराव करत योगाचे आरोग्यदायी फायदे अनुभवले. योगामुळे शरीर सुदृढ राहण्याबरोबरच मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. ताड, पर्यवेक्षक श्री. व्ही. पी. देशमुख, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करत "योग करा, निरोगी रहा" हा संदेश प्रभावीपणे पोहोचविला. विद्यालयाच्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडूनही कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment