विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेला प्रारंभ; मतदारांनी सहकार्य करावे – उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांचे आवाहन

राजेंद्र खैरनार | पाचोरा
मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार "स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन" (विशेष सखोल पुनरिक्षण) अभियान राबविण्यात येत असून, १८ पाचोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार पाचोरा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत विविध टप्प्यांमध्ये कामकाज सुरू करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घराघरांत जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सुनावण्या घेण्यात येतील. सुनावणीवेळी मतदारांना निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या ११ प्रकारच्या पुराव्यांपैकी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पाचोरा व भडगाव तालुक्यांसाठी एकूण १५ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या १८ पाचोरा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २४ हजार ३४३ मतदार असून त्यापैकी २ लाख ८२ हजार ८१५ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. ही टक्केवारी ८७.२० इतकी आहे. अद्याप ४१ हजार ५२८ मतदारांचे मॅपिंग बाकी असून ३० हजार २७४ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळून आली आहे. या संदर्भातील पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करून मतदारांमध्ये जागृती निर्माण करावी, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मतदार याद्यांची अचूकता ही लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक पात्र नागरिकाने या विशेष पुनरिक्षण मोहिमेत सहभाग घेऊन आपली माहिती योग्य व अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..