अस्थींचे वृक्षात रूपांतर; स्व. गणेश कोळी यांच्या स्मृतींना हरित अभिवादन....! कुरंगीतील कुटुंबाने जपली पर्यावरणाची नाळ; समाजासमोर ठेवला अनुकरणीय आदर्श
राजेंद्र खैरनार, पाचोरा मुख्य संपादक
पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात एका कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जतन करण्यासाठी केलेला उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. पोलीस कर्मचारी स्वर्गीय गणेश कोळी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने अस्थी विसर्जन न करता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अभिनव निर्णय घेतला.
स्व. गणेश कोळी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शेतात अस्थींचे विसर्जन करून त्या ठिकाणी वडाचे रोप लावण्यात आले. त्यांच्या वडिलांनी किरण कोळी तसेच एरंडोल महसूल विभागातील कर्मचारी विजय कोळी यांनी हा उपक्रम राबवत आपल्या मुलावरील प्रेम आणि निसर्गाप्रती असलेली बांधिलकी व्यक्त केली.
आज हे वडाचे रोप केवळ एक वृक्ष नसून स्व. गणेश कोळी यांच्या आठवणींचे जिवंत स्मारक बनले आहे. श्रद्धा, संस्कार आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम या कृतीतून दिसून येत आहे.
कोळी कुटुंबाच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत असून, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होत आहे. दुःखाच्या प्रसंगालाही सकारात्मक सामाजिक संदेशाची जोड देत त्यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
स्व. गणेश कोळी यांच्या स्मृतींना अशा हरित स्वरूपात जपण्याचा हा उपक्रम अनेकांना पर्यावरणपूरक विचारांची दिशा देणारा ठरत आहे.
Comments
Post a Comment