अवैध वाळू माफियांवर महसूल विभागाचा धडक प्रहार; दोन जेसीबी जप्त.....! तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई; महसूल व पोलिसांच्या संयुक्त मोहिमेमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ
मांडकी (ता. भडगाव) :
भडगाव तालुक्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल विभागाने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली मांडकी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धाड टाकून दोन जेसीबी यंत्रे जप्त करण्यात आली. जप्त केलेली यंत्रे पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालय, भडगाव येथे जमा करण्यात आली आहेत.
नैसर्गिक संपत्तीची मोठ्या प्रमाणावर होणारी लूट रोखण्यासाठी महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविली. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कठोर भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी दिनेश येंडे (गिरड भाग), ग्राम महसूल अधिकारी लोकेश महाजन, करण कुलकर्णी, डी. एस. काळे, रामकृष्ण मनोरे (महसूल सेवक), मांडकीचे पोलीस पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच पीएसआय सुशील सोनवणे आणि त्यांच्या पथकाने कारवाई यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
Comments
Post a Comment