बकरी ईदपूर्वी पोलिसांचा सज्जतेचा इशारा....!पिंपळगाव हरेश्वरमध्ये धडक रुट मार्च; समाजकंटकांना पोलिसांचा थेट इशारा...!शांतता, सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासन सतर्क; नागरिकांत सुरक्षिततेची भावना बळकट*
राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज
दिनांक : २७ मे २०२६
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलत गावात भव्य आणि शिस्तबद्ध रुट मार्च काढून सज्जतेचा स्पष्ट संदेश दिला. गावात शांतता, सामाजिक ऐक्य आणि नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सतर्क असल्याचे या मार्चमधून अधोरेखित झाले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात हा रुट मार्च पार पडला. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच होमगार्ड जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील प्रमुख चौक, बाजारपेठ, संवेदनशील भाग, गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवरून पोलिसांनी पायदळ संचलन करत नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास दिला.
सणाच्या काळात कोणत्याही अफवा, तणाव किंवा अनुचित प्रकाराला थारा दिला जाणार नाही, असा कठोर संदेश पोलिसांनी या मार्चद्वारे समाजकंटकांना दिला. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अप्रत्यक्षपणे देण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी नागरिकांना शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावरील अफवा किंवा भडक संदेशांवर विश्वास ठेवू नये, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा घटना दिसून आल्यास तात्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांच्या या धडक रुट मार्चमुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही पोलिस प्रशासनाच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. आगामी बकरी ईद सण शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
Comments
Post a Comment