पदभार स्वीकारल्यापासून हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याचा धाक; लेडी दबंग सिंघम कल्याणी वर्मा मॅडम यांचा उल्लेखनीय कार्यगौरव


राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज
पाचोरा तालुक्यातील हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी म्हणून दिनांक 14 जुलै 2025 रोजी ए.पी.आय. श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण पोलीस हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे नवे पर्व सुरू झाले आहे, अशी भावना आज पंचक्रोशीतील नागरिक, महिला वर्ग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे. अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी आपल्या धाडसी, निर्भीड आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीच्या जोरावर अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत परिसरात कायद्याचा प्रभावी धाक निर्माण केला आहे.

पदभार स्वीकारताच श्रीमती कल्याणी वर्मा यांनी अवैध धंदे, गुटखा विक्री, जुगार, सत्ता-पत्ता, विमल आणि इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात मोहीम उघडली. त्यांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अनेक अवैध व्यवसायांचे धाबे दणाणले असून कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींना मोठा आळा बसला आहे. त्यांच्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना पळता भुई थोडी झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

विशेषतः महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आज हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील महिला निर्धास्तपणे आपली दैनंदिन कामे करत असून पोलीस प्रशासनाबद्दल त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या आणि महिलांवर होणारे परिणाम श्रीमती वर्मा यांनी जवळून समजून घेतले. त्यामुळेच त्यांनी अशा सामाजिक विकृतींविरोधात कठोर पावले उचलून अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे.

त्यांच्या कार्यकाळात पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला असून कायद्याबाबत जनजागृती, सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा हस्तक्षेपाला बळी न पडता त्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले. त्यामुळे आज त्या केवळ पोलीस अधिकारी म्हणून नव्हे, तर जनतेच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जात आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय, धाडसी आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत दैनिक दिव्य मराठी आयोजित "जळगाव पोलीस सन्मान सोहळा – 2026" मध्ये त्यांना "उत्कृष्ट महिला प्रभारी अधिकारी" म्हणून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीचा आणि जनतेसाठी केलेल्या योगदानाचा गौरव मानला जात आहे.

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श ठेवत सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांनी आपल्या कामातून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे केवळ एका महिला अधिकाऱ्याचा गौरव नसून, समाजातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण देण्यासाठी झटणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठेचा सन्मान आहे.

या गौरव सोहळ्यास जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर नागरिक तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.

आज हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ, महिला मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांकडून श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात विविध संस्थांकडून त्यांचा अनेक वेळा सत्कार करण्यात आला असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

धाडस, शिस्त, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेली तळमळ यामुळे आज श्रीमती कल्याणी वर्मा मॅडम यांची ओळख संपूर्ण परिसरात "लेडी दबंग सिंघम" म्हणून निर्माण झाली असून त्यांचा हा गौरव हरेश्वर पिंपळगाव पोलीस स्टेशन तसेच संपूर्ण पाचोरा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद