खाकीतील माणुसकी! पोलीस अंमलदार शरद पाटील यांच्या सतर्कतेने १७ वर्षीय तरुणाला मिळाले नवजीवन
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चैनल
पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या खाकी वर्दीतील देवदूत! पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचारी शरद पाटील यांच्या सतर्कतेमुळे एका १७ वर्षीय तरुणाला जीवदान मिळाले आहे.
"पोलीस म्हणजे केवळ कडक शिस्त आणि कायदा नव्हे, तर संकटसमयी धावून येणारा खरा देवमाणूस असतो," याचाच प्रत्यय पाचोरा येथे आला आहे. पाचोरा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शरद पाटील यांच्या अतुलनीय सतर्कतेमुळे आणि चातुर्यामुळे एका १७ वर्षीय तरुणाला मरणाच्या दारातून सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका वृद्ध माता-पित्याचा एकुलता एक आधार वाचला असून, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे. परिसरातून या खाकी वर्दीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काय घडली घटना?
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील सुमित विजय घुलवे (वय १७) हा तरुण काही वैयक्तिक कामानिमित्त पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला होता. प्रचंड मानसिक ताणतणावात असलेल्या सुमितने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. त्याने आपल्या व्हॉट्सअॅपवर "आपली जीवनयात्रा संपवत आहे" असा स्टेटस ठेवला होता. हा स्टेटस पाहताच त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी तात्काळ नाशिक पोलिसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली.
क्षणाचाही विलंब न करता शोधमोहीम हाती
नाशिक पोलिसांनी सुमितचा मोबाईल ट्रॅक केला असता, त्याचे लोकेशन जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखवत होते. नाशिक पोलिसांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पाचोरा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. पोलीस कर्मचारी शरद मांगो पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तांत्रिक मदतीने अचूक लोकेशन शोधले. हे लोकेशन ‘मित्रा टाईप’ जवळील महादेव मंदिर परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ असल्याचे निष्पन्न झाले आणि शरद पाटील यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.
आणि सुमितचे प्राण वाचले!
पोलीस कर्मचारी शरद पाटील यांनी तातडीने रेल्वे ट्रॅकच्या दिशेने धाव घेतली. तिथे सुमित रेल्वेसमोर उडी घेण्याच्या तयारीत होता. शरद पाटील यांनी अत्यंत संयमाने आणि माणुसकीच्या भावनेतून सुमितशी संवाद साधला, त्याचे समुपदेशन केले आणि त्याला त्या निर्णयापासून परावृत्त करून सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पाचोरा पोलीस ठाण्यात आणून धीर देण्यात आला व त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
“पोलीस खात्याची मान उंचावणारी कामगिरी”
या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी शरद पाटील तसेच त्यांना मदत करणारे संदीप पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. “तुम्ही दाखवलेली तत्परता आणि खाकीतील माणुसकीमुळे आज एका आई-वडिलांचा वृद्धत्वाचा आधार वाचला आहे. तुमच्या या कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस खात्याची मान उंचावली आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुकाची थाप दिली.
समाजात पोलिसांविषयी कृतज्ञतेची भावना
अनेकदा पोलिसांच्या कामाकडे संशयाने किंवा नकारात्मकतेने पाहिले जाते. मात्र, शरद पाटील यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता ही ‘खाकी वर्दीतील माणुसकी’चे जिवंत उदाहरण ठरली आहे. एका सतर्क पोलीस कर्मचाऱ्यामुळे एका कोवळ्या जिवाला नवजीवन मिळाले असून, सुमितच्या पालकांनी अश्रूपूर्ण डोळ्यांनी पाचोरा पोलिसांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment