मान्सूनपूर्व कामांना तातडीने वेग द्या : गटनेते सुरज संजय वाघ


राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज
पाचोरा : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळ्यापूर्वीच सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक सुरज संजय वाघ यांनी निवेदनाद्वारे पाचोरा नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील नालेसफाई, भुयारी गटारींची स्वच्छता तसेच उघड्या गटारींची तातडीने साफसफाई करण्यात यावी. विशेषतः कॉलनी परिसर, व्यापारी पेठ आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये पाणी साचणार नाही यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

मागील वर्षी नाले व गटारी वेळेत साफ न झाल्यामुळे अतिवृष्टीदरम्यान शहरातील अनेक भाग जलमय झाले होते. मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती, तर भुयारी मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला होता. अनेक वसाहतींचा प्रमुख बाजारपेठेशी संपर्क तुटला होता. झोपडपट्टी व सर्वसामान्य नागरिकांच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले होते.

यंदा अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने मान्सूनपूर्व कामांना तातडीने गती द्यावी, अशी आग्रही मागणी सुरज वाघ यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्यास भविष्यातील अनेक नागरी समस्या टाळता येऊ शकतात, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

या निवेदनावर भाजपाचे नगरसेवक गोपालदास अर्जुनदास वासवानी, राहुल अंकुश गायकवाड, अमरीन बी. अब्दुल रहेमान देशमुख, कविता विनोद पाटील आणि कविता उमेश हटकर यांच्या सह्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद