बकरी ईद पार्श्वभूमीवर पाचोरात पोलिसांचा फ्लॅग मार्च; शांतता भंग करणाऱ्यांना कडक इशारा....!डीवायएसपी बापू रोहम व पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात कडेकोट बंदोबस्ताचे शक्तिप्रदर्शन

राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज

पाचोरा : आगामी बकरी ईद सण शांततेत, सौहार्दपूर्ण आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखत पार पडावा यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे शहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलिसांच्या या फ्लॅग मार्चमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही अफवा, गैरप्रकार किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी अप्रत्यक्षपणे कडक इशाराच दिला आहे.

या रूट मार्चचे नेतृत्व डीवायएसपी श्री बापू रोहम साहेब तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार साहेब यांनी केले. पाचोरा पोलीस स्टेशन येथून सुरू झालेला हा मार्च शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपालिका परिसर, प्रकाश टॉकीज, बाहेरपुरा, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे पुन्हा पाचोरा पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

यावेळी पोलिसांचा शिस्तबद्ध ताफा, वाहनांची फळी, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथक तसेच डीबी पथकाची उपस्थिती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील संवेदनशील भागांमध्ये विशेष पाहणी करण्यात आली असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व बंधुभाव जपावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

रूट मार्चदरम्यान डीवायएसपी श्री बापू रोहन साहेब यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार साहेब यांनी देखील प्रत्येक ठिकाणी बंदोबस्ताची पाहणी करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले.

या वेळी पीएसआय श्री कैलास ठाकूर साहेब, पीएसआय श्री योगेश गणगे साहेब, पीएसआय श्री कृष्णा घायाळ, पीएसआय श्री सुनील पाटील यांच्यासह सर्व डीबी कर्मचारी, पोलीस स्टाफ, महिला पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी दाखवलेली सज्जता आणि सतर्कता ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिलासा देणारी ठरत असून, शहरात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट झाले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद