पाचोरा नगरपरिषदेत जनगणना प्रशिक्षणाचा पहिला टप्पा यशस्वी...१ ते ५ मे दरम्यान नागरिकांनी स्वगणना करून जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्याधिकारी मगेश देवरे
राजेंद्र खैरनार | सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषदेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी वातावरणात संपन्न झाला. दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडलेल्या या तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रात जनगणना कार्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, प्रगणक व पर्यवेक्षकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
संपूर्ण जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी या प्रशिक्षणामध्ये माहिती संकलनाची आधुनिक पद्धत, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, माहिती नोंदणीची तांत्रिक प्रक्रिया तसेच नागरिकांशी संवाद साधण्याच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
करअधिक्षक डी. एस. मराठे, प्राध्यापक रुद्रस्वाड तसेच नगररचना विभागाचे धिरज नेटके यांनी प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन करत जनगणनेचे महत्त्व अधोरेखित केले. जनगणना ही केवळ आकडेवारी नसून भविष्यातील शासकीय योजना, विकास आराखडे आणि नागरिकांच्या गरजांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी श्री. मगेश देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण सत्र पार पडले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना सेवाभावाची शपथ देण्यात आली. शहरातील लोकसंख्येशी संबंधित विविध सामाजिक, आर्थिक व नागरी पैलूंची अचूक माहिती संकलित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
Comments
Post a Comment