“१ मेच्या ग्रामसभेत अनमॅप व वगळलेल्या मतदारांची यादी होणार जाहीर; निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही — प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांचा कडक इशारा”


राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा : आगामी विशेष संक्षिप्त मतदार पुनरिक्षण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पाचोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रशासनाने मोठी आणि महत्त्वपूर्ण कार्यवाही सुरू केली असून, महाराष्ट्र दिनानिमित्त दिनांक १ मे २०२६ रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे विशेष वाचन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग, पाचोरा यांनी काढलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आदेशानुसार, १८ पाचोरा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी ग्रामसभेत उपस्थित राहून “अनमॅप” असलेल्या मतदारांची तसेच वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी सार्वजनिकरित्या वाचून दाखवायची आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, सद्याच्या मतदार यादीतील अनेक मतदारांचे सन २००२ मधील अंतिम मतदार यादीशी Mapping प्रलंबित असून, या प्रक्रियेमध्ये अचूकता आणण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावपातळीवरच मतदार यादीतील त्रुटी, विसंगती आणि प्रलंबित नोंदी समोर येणार आहेत.
सदर आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ग्रामसभेस संबंधित यादी सोबत आणणे बंधनकारक राहील. तसेच ग्रामसभेमध्ये नागरिकांसमोर मतदार यादीचे वाचन करून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. निवडणूक विषयक हे काम अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे असल्याने कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
यासोबतच सर्व राजकीय पक्षांच्या तालुका अध्यक्ष आणि प्रतिनिधींनाही सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या स्तरावरील BLA यांनी ग्रामसभेला उपस्थित राहून BLO यांना सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र आदेश देत ग्रामसभेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेला यंदा निवडणूक पारदर्शकतेची विशेष जोड मिळणार असून, गावागावातील मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत नागरिक अधिक सजग होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रांत अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी भूषण अहिरे यांनी संबंधित सर्व BLO, BLA, ग्रामपंचायत प्रशासन तसेच निवडणूक यंत्रणेला कडक इशारा देत आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद