“लेडी सिंघम” सपोनि कल्याणी वर्मा यांची धडाकेबाज कारवाई ; पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध दारू, सट्टा-जुगार, पेट्रोल विक्री व तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल....विशेष मोहिमेत ३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त ; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले
मुख्य संपादक : राजेंद्र खैरनार
पाचोरा प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांनी अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत विविध पथके तयार करून गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित केली. त्यानुसार अवैध गावठी हातभट्टी दारू, सट्टा-जुगार, बेकायदेशीर पेट्रोल विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सातगाव डोंगरी येथील ब्राम्हणी नदीच्या काठावर तसेच धरण परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपी नामे १) बाजीराव तुराब तडवी, २) दिपक सुपड्डु तडवी, ३) शौकत सिकंदर तडवी, ४) कासम रमजान तडवी, ५) अनिल मासूम तडवी, ६) सुनिल मासूम तडवी, ७) सोपान चंदू तडवी, ८) संतोष राजू भिल आणि ९) भिवराबाई भिल यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ, ब, क, ई) प्रमाणे गुन्हे नोंद केले.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचे ४९०० लिटर गुळ-नवसागर मिश्रित कच्चे रसायन, १७ हजार ५०० रुपयांचे ३५० लिटर उकळते पक्के रसायन तसेच २१ हजार रुपयांची २१० लिटर तयार गावठी दारू असा एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच पिंपळगाव हरे गावातील बाजारपट्टा भागात सुरू असलेल्या सट्टा-जुगार अड्ड्यावर छापा टाकून आरोपी १) भागवत लक्ष्मण पाटील, २) दिलीप कांतीलाल तेली, ३) शिवानंद तुळशीराम लोहार, ४) गजानन भिवसन बहादुरे, ५) ज्ञानेश्वर प्रकाश तेली, ६) शंकर प्रकाश तेली, ७) विकास पांडुरंग पाटील व ८) संदीप पाटील यांना ५४ हजार ८७० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ४९ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, वाडी शेवाळे गावातील बसस्थानक परिसरातील एका टपरीवर कोणताही शासकीय परवाना नसताना अत्यंत धोकादायक पद्धतीने पेट्रोलची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मंगेश दिलीप काचोळे (पाटील) याच्याकडून दोन प्लास्टिक ड्रममध्ये साठवलेले अंदाजे ३५ लिटर पेट्रोल, किंमत ३ हजार ६७५ रुपये, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसमाविरुद्ध आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पिंपळगाव हरे गावातील बाजारपट्टा परिसरात अल्पवयीनांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपी १) अनिल संजय गुंजाळ, २) शरीफखाँ जिकरेखाँ पठाण, ३) मनोज सुकलाल जाधव व ४) पंकज भाऊराव गरुड यांच्याविरुद्ध तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंधक अधिनियम २००३ चे कलम ६ (ब) व २४ प्रमाणे गुन्हे नोंद केले आहेत.
ही संपूर्ण कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत पोउपनि विठ्ठल पवार, पोहेकॉ अरुण राजपूत, शैलेश चव्हाण, अतुल पवार, तात्याबा नागरे, अमोल पाटील, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, प्रशांत पाटील, भारत पाटील, प्रमोद वाडीले, योगेश भिलखेडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पिंपळगाव हरेश्वर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी उघडलेली ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून, सपोनि कल्याणी वर्मा यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
Comments
Post a Comment