अवघ्या २४ तासांत ‘हिट अँड रन’चा छडा; पिंपळगाव हरे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी कुरंगी येथून जेरबंद


राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी | दि. २९ एप्रिल २०२६
पाचोरा तालुक्यातील लोहारा दुरक्षेत्र हद्दीत घडलेल्या भीषण दुचाकी अपघात प्रकरणाचा अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावत पिंपळगाव हरे पोलिसांनी अपघात करून फरार झालेल्या आरोपीस जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दि. २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १.०० ते १.३० वाजेच्या सुमारास लोहारा दुरक्षेत्र हद्दीतील म्हसास धरणाजवळ, तपेश्वर इंग्लिश मिडीयम शाळेसमोर दोन मोटारसायकलींचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात विजय रमेश भिल उर्फ सोनवणे हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले, तर मयुर साहेबराव भिल यांच्या तोंडावर गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय रमेश भिल उर्फ सोनवणे यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी फिर्यादी अजय रमेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर तसेच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी मा. बापू रोहम यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या सपोनि कल्याणी वर्मा यांनी तत्काळ विशेष तपास पथकाची स्थापना केली.
पोहेकॉ ८५८ तात्याबा नागरे व पोकॉ १५२ योगेश भिलखेडे यांच्या पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अपघात करून फरार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेत आरोपीस कुरंगी येथून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा नाकारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता कुरंगी ता.पाचोरा  त्या आरोपी ने अपघात केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ २८८२ शांतीलाल पगारे हे करीत आहेत.
या कारवाईमुळे पिंपळगाव हरे पोलिसांच्या जलद तपास कौशल्याचे परिसरात कौतुक होत असून, फरार आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, असा ठाम संदेश पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद