‘वॉश आऊट’ मोहीम ठरली गेमचेंजर; पिंपळगाव हरेश्वर परिसरात अवैध धंद्यांना पूर्णविराम — माहिती द्या ९५१८५०६४९४ वर, नाव राहील गोपनीय

राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या ‘वॉश आऊट’ मोहिमेने अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घातला आहे. सट्टा-पत्ता, जुगार अड्डे आणि गावठी दारू निर्मिती-विक्रीसारख्या बेकायदेशीर कारवायांना अक्षरशः पूर्णविराम मिळाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. ही कारवाई केवळ पोलिसी मोहीम नसून सामाजिक बदलाची सुरुवात ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम उभारली. डोंगरी, सातगाव, पिंपळगाव हरेश्वर, लोहारा, कुऱ्हाड खुर्द, वरखेडी, कळमसरा, शिंदाड यांसारख्या गावांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात त्यांनी थेट मोर्चा उघडला. छापेमारी, सतत गस्त आणि गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी जाळे उध्वस्त झाले.
या अवैध व्यवसायांचा सर्वात मोठा फटका बसत होता तो सर्वसामान्य नागरिकांना. तरुण पिढी व्यसनांच्या गर्तेत ओढली जात होती, कुटुंबांमध्ये तणाव वाढत होता आणि सामाजिक वातावरण बिघडत होते. मात्र, पोलिसांच्या कठोर भूमिकेमुळे आज या भागात शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गावागावात नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून महिलांनी विशेषतः या कारवाईचे स्वागत केले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या कारवाईमुळे ज्यांचे आर्थिक हितसंबंध बाधित झाले, अशा काही घटकांकडून विरोधाचे सूरही उमटले. मागील आठवड्यात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदली व्हावी यासाठी अप्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगली. परंतु, याला प्रत्युत्तर म्हणून वरखेडी, कुऱ्हाड खुर्द आणि अंबे वडगाव येथील नागरिकांनी एकजूट दाखवत प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले. “अशा धाडसी अधिकाऱ्यांची बदली झाल्यास पुन्हा अवैध धंद्यांचे डोके वर काढेल,” असा ठाम इशारा नागरिकांनी दिला आहे.
ही घटना एक महत्त्वाचा संदेश देते—कायद्याची अंमलबजावणी केवळ कारवाईने होत नाही, तर जनतेच्या पाठिंब्याने ती अधिक प्रभावी होते. पिंपळगाव हरेश्वर परिसरात सध्या दिसणारी शांतता ही पोलिसांच्या धाडसाची आणि नागरिकांच्या जागरूकतेची संयुक्त फलश्रुती आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन करत ९५१८५०६४९४ हा क्रमांक जाहीर केला आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याची हमी देत त्यांनी स्पष्ट केले आहे की, अवैध धंद्यांविरोधातील ही लढाई पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे.
एकूणच, ‘वॉश आऊट’ मोहीम ही केवळ पोलिसी कारवाई न राहता सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरत आहे. जर अशाच पद्धतीने प्रशासन आणि जनता हातात हात घालून पुढे सरसावली, तर पाचोरा तालुका अवैध धंदेमुक्त करण्याचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..