१ मेपासून घरबसल्या जनगणना; मोबाईलवरून माहिती भरा, स्वतःचा आयडी मिळवा !...डिजिटल जनगणना-2027 ची ऐतिहासिक सुरुवात; 15 मेपर्यंत नागरिकांना ‘स्वयंगणना’ची सुवर्णसंधी...!

राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा | प्रतिनिधी
भारत सरकारच्या वतीने होणाऱ्या जनगणना-2027 प्रक्रियेला यंदा अत्याधुनिक डिजिटल स्वरूप प्राप्त झाले असून प्रथमच नागरिकांना घरबसल्या मोबाईल अथवा संगणकाद्वारे स्वतःची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशाच्या विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी जनगणना प्रक्रिया आता अधिक पारदर्शक, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

तहसिल कार्यालय पाचोरा (जळगाव) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार, जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्यात राज्यात दि. 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान घरयादी व घरगणना करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी नागरिकांना दि. 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत “Self Enumeration” अर्थात स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जनगणना संचलनालय, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी https://se.census.gov.in हे अधिकृत वेब पोर्टल सुरू करण्यात आले असून या पोर्टलवर नागरिक स्वतःची माहिती स्वतः भरू शकणार आहेत. माहिती भरल्यानंतर प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र ओळख क्रमांक (ID) प्राप्त होणार असून तो जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

त्यानंतर दि. 16 मे 2026 पासून जनगणनेकामी घरभेट देणाऱ्या प्रगणकास (Enumerator) हा आयडी दिल्यानंतर संबंधित माहिती अधिकृतरीत्या पोर्टलवर नोंदवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी माहिती अचूक व वेळेत भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विशेष म्हणजे, या पोर्टलवर तब्बल 14 भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध असून नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वेळेअभावी कार्यालयीन प्रक्रियेत सहभागी होऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

तहसिलदार पाचोरा तथा चार्ज अधिकारी जनगणना-2027 यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाने अधिकृत पोर्टलवर आपली माहिती भरून देशाच्या राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद