वडिलांच्या हस्ते मुलीचा शिवविवाह; गाळण बुद्रुकमध्ये रूढींना छेद देत पाटील परिवाराचा आदर्श सोहळा


राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल

गाळण बु.:अलीकडच्या काळात विवाह सोहळ्यांमध्ये वाढत चाललेली उधळपट्टी, दिखाऊपणा आणि अनावश्यक खर्च ही चिंतेची बाब ठरत असताना, पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील परिवाराने या प्रवाहाला छेद देत एक आदर्श निर्माण केला आहे.
गाळण बुद्रुक येथील शिवसेवक व शिवप्रचारक तसेच पाचोरा एसटी डेपोचे हेड मेकॅनिक राजेंद्र पाटील यांनी आपल्या उच्चशिक्षित कन्या पल्लवी हिचा विवाह माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील उच्चशिक्षित युवक नवनाथ अनपट यांच्याशी अत्यंत साध्या, संस्कारप्रधान आणि शिवविवाह पद्धतीने संपन्न केला.
या विवाह सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वडिलांनीच स्वतः आपल्या मुलीचा संपूर्ण विवाहविधी पार पाडला, जे अत्यंत दुर्मिळ व प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. विवाह निश्चितीपासून ते प्रत्यक्ष सोहळ्यापर्यंत सर्व विधी मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत, अनाठायी खर्च टाळून पार पडले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही दिखाऊपणाला पूर्णपणे नकार देत साधेपणाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
विवाह मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले. पारंपरिक अक्षदांऐवजी तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून शिवविवाह विधी पार पडला. उपस्थितांचे स्वागतही “नमस्कार”ऐवजी “जय जिजाऊ, जय शिवराय” अशा घोषणांनी करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण संस्कारमय आणि प्रेरणादायी बनले.
या विवाह सोहळ्यास मराठा सेवा संघाचे महासचिव चंद्रशेखर शिखरे, पुरुषोत्तम जाधव तसेच संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर शिखरे यांनी शिवविवाहाचे महत्त्व, गरज आणि त्यातील संस्कार यावर मार्गदर्शन केले. जिजाऊ वंदनेने सुरू झालेला हा सोहळा शिवसप्तक व शिवशपथ घेऊन पार पडला.
आजच्या काळात विवाहातील वाढता दिखाऊपणा आणि खर्चिक स्पर्धा यांना नाकारत, संस्कार, साधेपणा आणि सामाजिक जबाबदारी यांना प्राधान्य देणारा हा विवाह सोहळा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. विशेषतः उच्चशिक्षित तरुणाईमध्ये अशा शिवविवाहांची वाढती पसंती दिसून येत असून, पाटील कुटुंबाचा हा उपक्रम नक्कीच अनुकरणीय ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..