अवैध खननावर प्रशासनाची कडक कारवाई; ट्रॅक्टर-डंपर लिलावात

राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणांवर प्रशासनाने अखेर कडक भूमिका घेतली असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई करत जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अवैध खनन करणाऱ्या घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तहसिल कार्यालय पाचोरा यांच्या वतीने दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता जप्त ट्रॅक्टर, ट्रॉली आणि डंपर वाहनांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. संबंधित वाहन मालकांना यापूर्वीच दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी दंडाची रक्कम शासनाकडे जमा करण्यास टाळाटाळ केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 176 ते 184 अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात येत आहे.
या अंतर्गत जप्त वाहनांना “जमीन महसूल थकबाकी” म्हणून घोषित करून त्यांचा लिलाव करण्यात येणार असून, लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या मार्फत वाहनांचे मूल्यांकन करून त्यांची “हातची किंमत” निश्चित करण्यात आली आहे.
लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट अटी व शर्ती जाहीर केल्या आहेत. इच्छुकांना लिलावात सहभागी होण्यासाठी रु. 1000 अर्ज शुल्क (न परतावा) आणि प्रत्येक वाहनासाठी रु. 5000 अनामत रक्कम जमा करणे आवश्यक राहणार आहे. तसेच, सर्वोच्च बोली लावणाऱ्या व्यक्तीस 24 तासांच्या आत रक्कम जमा करणे बंधनकारक असेल.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे अवैध खनन व वाहतूक करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, भविष्यात अशा प्रकारांवर आणखी कडक कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासन शून्य सहनशीलता धोरण अवलंबत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी व संस्थांनी या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद