अश्लील व्हिडिओच्या धमकीतून खून; पती-पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा : पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाचा तपास करताना खुनाचा थरारक प्रकार उघडकीस आला असून अश्लील व्हिडिओच्या धमकीतून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरसाडे तांडा नं. ३ येथील संजय भिमा राठोड (वय ३३, व्यवसाय मजुरी) यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय २५) हा दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेअकरा ते दि. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मिसिंग रजिस्टर क्रमांक १५/२०२६ अन्वये बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित इसम संजय परशुराम जाधव याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी अधिक कसून चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात उघड झाले की, आरोपी संजय जाधव याची पत्नी सोनाली संजय जाधव हिचे व मयत विजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजय राठोड याने सोनालीचे अश्लील व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून तिला त्याद्वारे धमकावणे सुरू केले होते. ही बाब पती संजय जाधव याला समजताच त्याने पत्नीच्या संगनमताने विजय राठोड याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.
सदरची कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार) यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या सूचनांनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी पोउपनि विठ्ठल पवार, पोहेकॉ किरण ब्राम्हणे, अतुल पवार, अभिजित निकम, पोना राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, पोकॉ अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे व सागर पाटील यांनी या कारवाईत सहकार्य केले.
Comments
Post a Comment