उत्तर महाराष्ट्रात कामगार संघटन बळकटीकरणासाठी श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा भव्य दौरा जाहीर
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल
उत्तर महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना आता मैदानात उतरली आहे. शिवसेना नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्रात व्यापक संघटन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, या दौऱ्यामुळे कामगार चळवळीला नवे बळ मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या दौऱ्यादरम्यान कामगारांचे प्रलंबित प्रश्न, संघटन विस्तार, तसेच आगामी लढ्यांची रणनीती यावर सखोल चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कामगारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण दौऱ्यात प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण, प्रदेश संघटक श्री. नानासाहेब बच्छाव, सफाई कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष श्री. संतोष मकवाना आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. जितेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दौऱ्याची सुरुवात ५ एप्रिल रोजी जळगाव येथून होणार असून, त्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक आणि शिर्डी येथे बैठका घेण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना आखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “आपली एकजूट हीच आपली ताकद” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन संघटना आता अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.
👉 संघटन बळकट करा – हक्कांसाठी ठामपणे उभे रहा!
👉 एकत्र या – संघटित व्हा – आणि आपल्या हक्कांसाठी लढा!
— प्रसिद्धी विभाग
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना, उत्तर महाराष्ट्र
Comments
Post a Comment