Breaking news# Pachora Municipal Councilच्या एआय व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे लोकार्पण
राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा : शहरातील नागरिकांना सेवा-सुविधांची माहिती व तक्रार निवारणाची सुविधा घरबसल्या उपलब्ध व्हावी या उद्देशाने Pachora Municipal Councilने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या अत्याधुनिक सुविधेचे लोकार्पण नगराध्यक्षा सूनिताताई किशोरआप्पा पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
नगरपालिकेच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेता सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे, रेहमान तडवी, प्रियांका पाटील, मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
असा आहे एआय चॅटबॉट
हा एआय-आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट नागरिकांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तरे देऊन विविध सेवा-सुविधांची माहिती उपलब्ध करून देणार आहे. तसेच शहरातील समस्यांबाबत तक्रारी नोंदविण्याची सोयही यातून होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची गरज कमी होऊन पारदर्शकता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारचा एआय चॅटबॉट राबविण्यात आल्याने नागरिकांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जलद व सोयीस्कर सेवा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राज्य शासनाने १५० दिवसांच्या कृती आराखड्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ई-ऑफिस प्रणाली, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, स्वच्छता, प्रशिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रम यावर भर देण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
नगराध्यक्षा सूनिताताई किशोरआप्पा पाटील यांनी सर्व नागरिकांनी या एआय चॅटबॉटचा सक्रिय वापर करावा, असे आवाहन केले.
अशी मिळवा माहिती
18002335259 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून नागरिकांना आवश्यक माहिती मिळवता येईल तसेच शहरातील समस्यांविषयी तक्रारी नोंदविता येतील.
Comments
Post a Comment