तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या तरुणास पाचोरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; शस्त्र जप्त, गुन्हा दाखल, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
✍️ राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
पाचोरा (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी पाचोरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक केली असून त्याच्याकडून धारदार तलवार व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हे उघड करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी साहेब यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलिसांनी परिसरात गस्त व गोपनीय माहिती संकलनावर भर दिला होता.
दरम्यान, पाचोरा पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की अंतुर्ली फाट्याजवळ एक इसम धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. या माहितीच्या आधारे पाचोरा गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
पोलिस पथकाने अंतुर्ली फाटा परिसरात जाऊन संशयित इसम नामे ललित गोपाल चौधरी (रा. न्हावी गल्ली, पारोळा, जि. जळगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी तलवार तसेच मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 79/2026, शस्त्र अधिनियम कलम 4/25 अन्वये पोकॉ संदीप राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पोउपनिरी कृष्णा घायाळ, पोकॉ संदीप राजपूत, पोकों जितेश पाटील, पोकॉ योगेश पाटील, पोकों हरीश परदेशी यांच्या पथकाने केली.
पाचोरा पोलिसांच्या या तत्पर आणि धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांची धाक निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment