पाचोरा नगरपरिषदेचा २१०.३२ कोटींचा करवाढविरहित अंदाजपत्रकास हिरवा कंदील
राजेंद्र खैरनार, मुख्य संपादक – सत्यशोध न्यूज चॅनल
पाचोरा नगरपरिषद च्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तब्बल रु. २१०.३२ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक विशेष सभेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचे अंदाजपत्रक कोणतीही करवाढ न करता सादर करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सभेत आठ लाख रुपयांच्या शिलकीसह हे अंदाजपत्रक एकमताने मंजूर झाले. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरही उत्पन्नवाढीवर भर देत अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला. नगरपालिका स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
विकासकामांना प्राधान्य
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय योजनांवर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये:
महाराष्ट्र राज्यस्तर नगरोत्थान महाअभियान योजना (रस्ते प्रकल्प)
महाराष्ट्र राज्यस्तर नगरोत्थान महाअभियान योजना (भुयार गटार)
अमृत २.० प्रकल्प
या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षात करण्यात येणार असून, पायाभूत सुविधांच्या उभारणीतून शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील होत्या. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाधिकारी अमोल कुमावत यांनी अंदाजपत्रकाचे सविस्तर सादरीकरण केले.
यावेळी उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेते सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेते सूरज वाघ तसेच सभापती सतीश चेडे, प्रवीण ब्राह्मणे, रेहमान तडवी, प्रियंका पाटील, मीनाक्षी एरंडे यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
करवाढ टाळत विकासाला प्राधान्य देणारे हे अंदाजपत्रक आगामी काळात कितपत प्रभावी ठरते, याकडे आता पाचोरा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment