पाचोरा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; बसस्थानक पिकपॉकेट प्रकरणाचा पर्दाफाश, तीन महिला आरोपी जेरबंद
पाचोरा (प्रतिनिधी) –
शहरातील गर्दीच्या ठिकाणी विशेषतः बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुबाडणाऱ्या पिकपॉकेट टोळ्यांचा उपद्रव वाढत असताना पाचोरा पोलिसांनी मोठी कामगिरी करत एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हे शोध पथकाने तीन महिला आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.१५ ते ३.४५ वाजेदरम्यान श्रावण ताराचंद पाटील (वय ७०), व्यवसाय शेती, रा. वडगाव खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव हे पाचोरा बसस्थानक येथे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून १३,४०० रुपये लबाडीने चोरून नेले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५११/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. त्याच अनुषंगाने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी बसस्थानक परिसरात पिकपॉकेट व टेहळणी करत असलेल्या तीन संशयित महिलांची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित महिलांना ताब्यात घेतले व पाचोरा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.
चौकशीत त्यांनी सदर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर पंचासमक्ष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंगझडती घेण्यात आली. त्यामध्ये आरोपी क्रमांक १ निर्मला सुनील जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, ता. जामनेर) हिच्याकडून १३,५०० रुपये, आरोपी क्रमांक २ सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. हिसोडा खुर्द, ता. भोकरदन, जि. जालना – सध्या रा. कुंभारी, ता. जामनेर) हिच्याकडून ६,६०० रुपये, तर आरोपी क्रमांक ३ उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, रा. कुंभारी, ता. जामनेर) हिच्याकडून १२,३०० रुपये असा एकूण ३२,४०० रुपये रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी करीत असून आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, तसेच आणखी पिकपॉकेट घटनांशी त्यांचा संबंध आहे का, याचा सखोल तपास करण्यात येत आहे. बसस्थानक, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असलेल्या पिकपॉकेट टोळ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याचा इशाराही दिला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ राहुल शिंपी, पोहेकॉ अशोक
हटकर, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/०१३२ श्रीराम अनिल शिंपी, मपोकॉ/२९२३ प्रियंका अर्जुन आहेर, मपोकों/महोमगार्ड /२२५८ सोनाली शशीकांत पाटील, महोमगार्ड/१३९७ कल्पना तानाजी निंबाळकर, महोमगार्ड /१४९९ संगीता मुरलीधर पाटील, इ.महिला होमगार्ड कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
पाचोरा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रवाशांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment