धारदार तलवारीसह दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक; पाचोरा पोलिसांची गुन्हे शाखेची आठवड्यातील सलग दुसरी धडक कारवाई

राजेंद्र खैरनार मुख्य संपादक शोध न्यूज चॅनल
पाचोरा प्रतिनिधी :
पाचोरा शहरात धारदार तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने आठवड्यातील सलग दुसरी धडक कारवाई करत शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर घटना टळली आहे.
जळगाव जिल्ह्यात शस्त्र अधिनियमाखालील गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी गुन्हे शाखेला विशेष पथक तयार करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, पाचोरा येथील जारगाव चौफुली परिसरात एक तरुण धारदार लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित इसम सोमनाथ वना पाटील (वय 19, रा. हनुमान नगर, पाचोरा, जि. जळगाव) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. 84/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत शस्त्र अधिनियमान्वये आठवड्यातील सलग दुसरी कारवाई करण्यात आली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक मा. कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील, हरीश परदेशी यांचा समावेश होता.
पाचोरा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश गेला असून, नागरिकांनीही अशा प्रकारच्या संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद