सिव्हिल सर्जन डॉ. स्वप्नील संजय सांगळे मैदानात उतरले, पण प्रश्न कायम : पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालय व कोल्हे आरोग्य उपकेंद्राचा बारा वर्षांचा अंधार

राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज चॅनल
ग्रामीण प्रतिनिधी:
पाचोरा तालुक्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची वास्तव स्थिती पुन्हा एकदा समोर आली असून, पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था आणि कोल्हे गावातील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले पण आजही बंद असलेले आरोग्य वर्धिनी उपकेंद्र हे ग्रामीण जनतेच्या आरोग्यावरील प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर तुटल्यानंतर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करावे लागले, ही बाब स्वतःच गंभीर आहे.
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दहा वर्षांपासून एकही कायमस्वरूपी किंवा निवासी डॉक्टर नियुक्त नाही. सध्या केवळ तीन कंत्राटी डॉक्टरांवर संपूर्ण रुग्णालयाचा भार असून तेही बाहेरगावाहून येत असल्याने त्यांची उपस्थिती अनिश्चित असते. परिणामी रुग्णांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते, तर अनेक वेळा उपचाराअभावी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे वळावे लागते.
रुग्णालयातील सिस्टर, परिचारिका, तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी यांची अनेक पदे रिक्त आहेत. औषधांचा नियमित पुरवठा नसल्याने रुग्णांना औषधे बाहेरून खरेदी करावी लागत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी उभारलेली निवासस्थाने पडीत अवस्थेत असून कोट्यवधींचा खर्च करून बांधलेली पोस्टमार्टम रूम आजही बंद आहे. काही वर्षांपूर्वी आगीत जळालेली एक्स-रे रूम अद्याप दुरुस्त न झाल्याने ही महत्त्वाची सेवा ठप्प आहे. संपूर्ण रुग्णालय परिसरात गवत वाढले असून अस्वच्छतेचे चित्र दिसून येते.
दुसरीकडे, पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावात सुमारे कोटी रुपये खर्चून उभारलेले आरोग्य वर्धिनी उपकेंद्र आजही कुलूपबंद आहे. अत्याधुनिक इमारत असूनही आरोग्य सेवा सुरू न झाल्याने ही जागा निष्क्रिय बनली आहे. परिसरात गवत वाढले असून खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. दवाखाना सुरू नसल्याने ही जागा समाजकंटक व दारुड्यांचा अड्डा बनत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. सार्वजनिक निधीचा असा अपव्यय ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी केलेली थेट बेपर्वाई असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.
या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एन.एस.यू.आय.च्या जनरल सेक्रेटरी श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास २६ जानेवारीपासून ग्रामीण रुग्णालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानुसार आंदोलनास सुरुवातही झाली.
या आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. स्वप्नील संजय सांगळे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देत पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयाची सखोल पाहणी केली. कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती, रिक्त कर्मचारी पदे भरणे, एक्स-रे व पोस्टमार्टम सेवा सुरू करणे, औषधांचा नियमित पुरवठा तसेच कोल्हे येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र तात्काळ कार्यान्वित करण्याबाबत सकारात्मक व ठोस कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी दिले.
या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले असले, तरी प्रशासनाकडून दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी आणि कितपत अमलात येतात, याकडे आता संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे. केवळ भेटी, पाहण्या आणि आश्वासनांपुरतेच हे प्रकरण मर्यादित राहिले, तर ग्रामीण जनतेचा उद्रेक अटळ ठरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद