भडगावात कारागिरीचा उत्सव; विश्वकर्मा जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी
राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्यूज चॅनल
भडगाव (प्रतिनिधी : प्रा. सुरेश कोळी)
सृष्टीचे शिल्पकार, कारागिरांचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती भडगाव शहरात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी साईबाबा मंदिर परिसरात तालुक्यातील सुतार समाजाच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी पार पडत परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
दरम्यान, विठोबा मिस्तरी व समाजबांधवांच्या वतीने स्वतंत्र मिरवणूक काढण्यात आली होती. समाजातील समन्वय आणि एकोप्याचे दर्शन घडवत मिरवणूक साई मंदिरात आणण्यात आली. येथे प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे शरद निकम व विठोबा मिस्तरी यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी सामूहिक आरतीत सहभाग घेतला.
साई मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. कारागिरांच्या कष्टाला सन्मान देणाऱ्या या सोहळ्याने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
भडगाव–पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने श्री विश्वकर्मा प्रतिमांचे वाटप करण्यात आले, यामुळे समाजबांधवांत समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास शरद निकम, संजय खैरनार, बापूराव शार्दुल (पत्रकार), किरण देवरे, शाम निकम, दीपक वाघ, सुरेश (भावडू) मिस्तरी, ईश्वर देवरे, महेंद्र देवरे, नाना मिस्तरी, गणेश खैरनार, एकनाथ खैरनार, दीपक गवळे, मनोज जाधव यांच्यासह भडगाव तालुक्यातील सर्व समाजबांधव व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त भडगावात कारागिरी, श्रद्धा आणि एकजुटीचा जागर करत समाजाने आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
Comments
Post a Comment