हक्क, कर्तव्य आणि संवेदनशीलतेची जाणीव घडवणारा प्रेरणादायी उपक्रम...! दिव्यांग हक्क, कायदेविषयक साक्षरता व पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संगम


(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा प्रतिनिधी :
समाज घडवताना केवळ शिक्षण नव्हे तर माणुसकी, संवेदनशीलता आणि कायदेविषयक जाणीव तितकीच महत्त्वाची असते, हे अधोरेखित करणारा एक आदर्श उपक्रम पाचोरा तालुक्यात साकार झाला. पाचोरा तालुका विधी सेवा समिती व रोटरी क्लब पाचोरा–भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गो. से. हायस्कूल येथे दिव्यांग दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम हा केवळ औपचारिक उपक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जबाबदारीचे बीज रोवणारा ठरला.
दिव्यांगांचे हक्क व अधिकार, पोकसो कायदा, शासनाच्या विविध योजना तसेच पर्यावरण साक्षरता व वृक्षारोपण जनजागृती अशा विविध विषयांचा समतोल मेळ या कार्यक्रमात साधण्यात आला. पाचोरा तालुका विधी सेवा समिती व रोटरी क्लबचे पदाधिकारी यांची उपस्थिती या उपक्रमाला दिशा देणारी ठरली.
प्रा. अ‍ॅड. वैशाली ताई बोरकर यांनी दिव्यांग दिनाच्या निमित्ताने केलेले मार्गदर्शन विशेष प्रभावी ठरले. दिव्यांग व्यक्ती या सहानुभूतीच्या नव्हे तर हक्कांच्या आधारावर समाजात सन्मानाने जगायला हव्यात, हा ठाम संदेश त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. “आजपासून माझ्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही दिव्यांग व्यक्तीस मी मदत करेन,” अशी शपथ विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आणि त्या क्षणी सामाजिक जाणीवेचा एक नवा अध्याय उघडला गेला.
अ‍ॅड. प्रशांत मालखेडे यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट केले. अ‍ॅड. के. एम. सोनावणे यांनी पोकसो कायद्यावर केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे व सजगतेची जाणीव करून देणारे ठरले.
पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यावर प्रा. प्रकाश विसपुते सर यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव करून दिली.
रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क व अधिकार स्पष्ट करताना रोटरीच्या पोलिओ निर्मूलनासह विविध सेवाभावी उपक्रमांचा आढावा मांडला. यावेळी रोटरी क्लबचे सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. सिद्धांत तेली, प्रा. डॉ. पंकज शिंदे, संजय कोतकर, भरत सिनकर तसेच वरिष्ठ शिक्षक बी. बी. कुमावत सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वल पाटील सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार के. एस. अहिरराव सर यांनी मानले. पर्यवेक्षक एल. एस. पाटील सर, प्रदीप पाटील सर व प्रशांत नैनाव सर यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या मोठ्या उपस्थितीने हा कार्यक्रम केवळ माहिती देणारा नव्हे, तर संवेदनशील, जागरूक आणि जबाबदार पिढी घडवण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद