श्री. गो. से. हायस्कूलमध्ये ‘कलारंग २०२५–२६’चा रंगतदार उत्सव विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना सृजनशील व्यासपीठ



(राजेंद्र खैरनार | मुख्य संपादक – सत्य शोध न्यूज चॅनल)

पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे शालेय वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कलारंग २०२५–२६’ या भव्य सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ जानेवारी ते ३ जानेवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवणे, हा ‘कलारंग’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन खलील देशमुख राहणार आहेत. उद्घाटन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अशोककुमार पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच वेळी रांगोळी, चित्रकला, हस्तकला व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनही होणार आहे.
‘कलारंग’ अंतर्गत रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनासह सामूहिक नृत्य, गीतगायन, फॅन्सी ड्रेस आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, सादरीकरण कौशल्य आणि संघभावना प्रकर्षाने दिसून येणार आहे. उपस्थित पाहुणे, पालक व नागरिकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विज्ञान प्रदर्शन, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वैज्ञानिक मॉडेल्समधून त्यांची प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन अनुभवायला मिळणार आहे.
शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कार्यक्रमांचा समारोप होणार असून दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी असतील. पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीप ओंकार वाघ यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, श्री. गो. से. हायस्कूलचे तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन यांच्यासह शालेय व तांत्रिक विभाग व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून ओम राठी (दर्शन फॅशन), डॉ. सुनिल पाटील (सुनिल नेत्रालय), नंदकुमार कोतकर (कोतकर जनरल स्टोअर्स), अनुराग भारतीया (विजय कापड), रमेश आबा पाटील (गजानन डेअरी), रवी अग्रवाल (नेरीवाला ड्रेसेस), डॉ. स्वप्निल पाटील (सिद्धीविनायक हॉस्पिटल), डॉ. अमोल जाधव (दिशा डेंटल क्लिनिक), अतुल शिरसमणे (आशीर्वाद कॉम्प्युटर), नंदू प्रजापत (आनंद मेडिकल) आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक एन. आर. पाटील (ठाकरे), उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडीण्य, उपप्रमुख रविंद्र बोरसे, प्रवेक्षिका अंजली गोहिल, प्रवेक्षक आर. बी. तडवी, आर. बी. बांठिया, क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
“न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते” या ब्रीदवाक्यानुसार ज्ञान, कला व संस्कार यांचा सुंदर संगम साधणारा ‘कलारंग २०२५–२६’ हा उपक्रम सुमारे २५०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या आनंददायी सोहळ्यास पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद