विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला विज्ञान प्रदर्शनातून नवी दिशा – आमदार किशोर आप्पा पाटील पाचोरा तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
पाचोरा | प्रतिनिधी (गाळण बु.) :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी व त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
पाचोरा तालुक्यातील गाळण बु. येथे पंचायत समिती पाचोरा शिक्षण विभाग व वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम शाळेचे अध्यक्ष बाबुलाल हरी राठोड होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विजय बनसोडे, गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड, मुख्याध्यापक रमेश पाटील, मुख्याध्यापिका कल्पना राठोड, शिक्षक सेना कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, विज्ञान शिक्षक रवींद्र चौधरी यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात सुमारे ११० बाल वैज्ञानिकांनी आपले नावीन्यपूर्ण प्रकल्प व शैक्षणिक साहित्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व संशोधनशील वृत्तीचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन वाल्मिक पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख अनिल पाटील यांनी केले. तहसीलदार विजय बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विज्ञान शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, “अशा विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवसर्जनशीलता, प्रयोगशीलता व प्रश्न विचारण्याची सवय विकसित होते,” असे सांगितले.
परीक्षक म्हणून पंकज देठे, रवींद्र सूर्यवंशी, अल्पा सयानी, रवींद्र चौधरी व उल्हास पाटील यांनी काम पाहिले. विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सजावटीसाठी कलाशिक्षक महेंद्र खरे, रवींद्र पाटील, महेश पाटील, व्ही. डी. पाटील, रोहिणी कोळी, पूनम लांडगे, तुषार पाटील यांनी विशेष सहकार्य केले. तसेच आश्रम शाळेचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वस्तीगृहातील शिक्षक-शिक्षिका, गट साधन केंद्रातील कर्मचारी व विशेष शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले. विज्ञान प्रदर्शनाच्या व्यवस्थेसाठी शिक्षकेतर व वस्तीगृह कर्मचारी पंढरी राठोड, राजेंद्र पाटील, गिरधर गायकवाड, ईश्वर सावंत, लहू पाटील व दादाभाऊ सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन – निकाल
दिव्यांग गट :
🥇 प्रथम – सिद्धेश किशोर राऊळ
🥈 द्वितीय – जानवी ईश्वर सातपुते
उच्च प्राथमिक गट :
🥇 प्रथम – कृष्णा गजानन पाटील
🥈 द्वितीय – आकांक्षा अमृत गायकवाड
🥉 तृतीय – दर्शन प्रेमराज रावळे
माध्यमिक / उच्च माध्यमिक गट :
🥇 प्रथम – अनुज अजय बडगुजर
🥈 द्वितीय – विजयदीप निवृत्ती शिंदे
🥉 तृतीय – समर्थ काशिनाथ चौधरी
प्राथमिक शिक्षक – शैक्षणिक साहित्य :
🥇 प्रथम – भूषणकुमार देविदास जगताप
🥈 द्वितीय – विद्या सचिन जोशी
🥉 तृतीय – भाग्यश्री अशोक अहिरराव
माध्यमिक शिक्षक – शैक्षणिक साहित्य :
🥇 प्रथम – रवींद्र हिलाल सूर्यवंशी
🥈 द्वितीय – प्रेमसिंग आनंदा पाटील
🥉 तृतीय – उल्हास श्रीराम पाटील
— राजेंद्र खैरनार
मुख्य संपादक, सत्यशोध न्यूज चॅनल
Comments
Post a Comment