ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप...!
(राजेंद्र खैरनार मुख्य संपादक सत्य शोध न्युज चॅनल)
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती नेत्या अभिलाषा रोकडे यांचा पुढाकार; आरोग्य, सन्मान व सुरक्षिततेचा संदेश
नगरदेवळा / प्रतिनिधी :
तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे एक स्तुत्य व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या पुढाकाराने शाळेतील सुमारे ८० ते ९० विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक गणेश खैरनार सर, मिलिंद सोनवणे सर, अनिल काटकर सर, संपत वानखेडे सर, राजपूत सर, परदेशी सर, योगेश पाटील, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना पाळी स्वच्छतेसारख्या विषयावर खुलेपणाने चर्चा होणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना अभिलाषा भिला रोकडे यांनी महिला व तरुणींच्या आरोग्य, सन्मान आणि स्वच्छतेबाबत आपली ठाम भूमिका मांडली.
“महिला व तरुणींचे आरोग्य व सन्मान जपणे ही केवळ जबाबदारी नसून सामाजिक कर्तव्य आहे. त्यांच्या शारीरिक स्वच्छतेसाठी व सुरक्षिततेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा व परिसरातील सर्व गावांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये कॉइन पॅड व्हेंडिंग मशीन बसविणे, सॅनिटरी पॅड वितरण मोहीम, पिरीयड स्वच्छता जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, पॅड डिस्पोजल मशीन तसेच ‘गुड टच – बॅड टच’ जनजागृती शिबिरे राबविण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी जाहीर केला.
हा उपक्रम विद्यार्थिनींच्या आरोग्याबरोबरच आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढविण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरणारा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment