शिस्त, सेवा आणि स्वावलंबनाचा संस्कार : शिंदे विद्यालयाचा स्काऊट कॅम्प

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्यशोध न्यूज चॅनल)

शिस्त, सेवा आणि स्वावलंबनाचा संस्कार : शिंदे विद्यालयाचा स्काऊट कॅम्प

आजच्या धावपळीच्या युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून जीवनमूल्यांची जाणीव करून देणारे अनुभव विद्यार्थ्यांना घडवणे काळाची गरज आहे. या जाणिवेतून कै. पि. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाने भैरवनाथ मंदिर, सावखेडा (ता. पाचोरा) येथे आयोजित केलेले एकदिवसीय स्काऊट शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची जिवंत शाळाच ठरली.

इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून शिस्त, संघभावना व सेवाभाव यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिबिराच्या अध्यक्षस्थानी सौ. सिंधुताई शिंदे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय पवार आणि मुख्याध्यापक किरण पाटील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने शिबिरास प्रेरणादायी वातावरण लाभले.

स्काऊट प्रार्थना, ध्वजगीत, वचन व नियमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व शिस्तीची जाणीव रुजवण्यात आली. स्काऊट चळवळीचे महत्त्व, प्रथमोपचार, जांभोरी शिबिराची संकल्पना तसेच विविध दोरीच्या गाठी यांसारख्या विषयांवर जिल्हा उपयुक्त गणेश पवार यांनी दिलेले मार्गदर्शन केवळ माहितीपूर्ण नव्हे तर जीवनोपयोगी ठरले.

या शिबिराचा खरा आत्मा मात्र सेवाभावातून प्रकट झाला. विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर स्वच्छ करून ‘स्वच्छता हीच खरी सेवा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. आगामी यात्रेचा विचार करून मंदिरास डस्टबिन भेट देणे हा विद्यार्थ्यांच्या सामाजिक भानाचा ठळक दाखला ठरला. यासोबतच डाळ-बाटीचा स्वयंपाक करणे, वाढणे व भांडी धुणे या उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाचे महत्त्व आत्मसात केले.

मनोरंजनात्मक कार्यक्रमांतून गाणी, नृत्य, गोष्टी व नाटिकांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. शिक्षणासोबत आनंद, शिस्तीसोबत सर्जनशीलता आणि ज्ञानासोबत संस्कार यांचा सुंदर संगम या शिबिरात अनुभवायला मिळाला.

या यशस्वी उपक्रमामागे मुख्याध्यापक जी. व्ही. सोमवंशी, श्रीमती जे. डी. आहेर, श्री हेमंत टोणपे, श्री राजू आव्हाड, श्री रवी सोनवणे,श्रीमतीअश्विनी सोनवणे,श्रीमती शितल पवार आदी शिक्षकवृंदांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम होते. शिंदे विद्यालयाचा हा स्काऊट कॅम्प विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त, सेवा व समाजभानाची दीपशिखा उजळवणारा ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद

पाचोरा शहरात दु:खद घटना! 16 वर्षांनंतर बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला पण जुळ्या बाळांचे मातृछत्र हरपलं...."माहेरची साडी"चित्रपटाची पाचो-या वासियांना झाली आठवण..