पाचोरा नगरपरिषदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत भव्य महिला बचत गट मेळावा उत्साहात संपन्न..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा :-महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व जीवनमान उन्नतीसाठी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी दिनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने दिनांक ३० जून २०२५ रोजी समर्थ लॉन्स, पाचोरा येथे भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मा. किशोर आप्पा पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिता पाटील, संजय गोहील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, भिमसेना, युवासेना चे प्रविणभाऊ ब्राह्मणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रशासनातील उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, आरोग्य अधिकारी नकवाल साहेब, इलेक्ट्रिक विभागाचे रेवेकर साहेब सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग,तहसीलदार विनोद कुमावत, कर अधिक्षक डी.एस. मराठे, प्रकल्प अधिकारी अर्जुन भोळे, इत्यादींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले, "महिला बचत गट हे ग्रामीण व शहरी विकासाचे महत्वाचे माध्यम असून अशा गटांना बँक कर्ज, प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. पाचोरामध्ये 'खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी महिला मार्ट' लवकरच सुरू करण्यात येणार असून महिलांच्या उत्पादनांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीची संधी मिळेल. तसेच सर्व बँकांनी CSR निधीतून शहर स्वच्छतेसाठी डस्टबिन उपलब्ध करून द्यावेत," असे आवाहनही त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केले. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी प्रस्ताविक करताना सांगितले की, "दिनदयाळ अंत्योदय योजनेचा उद्देश शहरी गरीब घटकांमध्ये स्वावलंबन वाढवणे असून, नगरपरिषद यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे."
कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी वंदना पाटील, विजया देवरे, विजया नारखेडे व अनुराधा लोंढे यांनी महिलांसमोर बचत गटांचे यशोगाथा, विपणन कौशल्य, लेखा
व्यवस्थापन व वित्तीय साक्षरतेबाबत मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सुमारे २ हजार महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी IDBI बँकेच्या CSR निधीतून डस्टबिनचे वाटप तर नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, समुदाय संघटक व स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment