मेहनतीचा विजय, स्वप्नांना मिळाले पंख!; पाचोऱ्याच्या भुषण पाटील ची मुंबई पोलिस दलात निवड, शिवसेना महिला आघाडीकडून जंगी सत्कार
राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक सत्यशोध न्यूज
पाचोरा : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठणाऱ्या तरुणांचा समाजाला नेहमीच अभिमान वाटतो. पाचोरा येथील युवा भुषण भगवान पाटील यानेही आपल्या मेहनतीच्या बळावर मुंबई पोलिस दलात स्थान मिळवत कुटुंबासह संपूर्ण पाचोरा शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध मान्यवरांकडून त्याचा गौरव करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भुषण पाटील याचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भुषणच्या मेहनतीचे आणि संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत त्याला भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. ललिताताई पाटील, जिल्हा संघटक सौ. बेबाताई पाटील, सौ. सुषमा पाटील, शहरप्रमुख सौ. मंदाकिनी पारोचे तसेच शहर समन्वयक सौ. प्रितीताई सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी भुषण पाटील याचा पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला.
यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. भुषण पाटील याचे यश हे अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी असून त्याच्या या कामगिरीमुळे परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मुंबई पोलिस दलात नियुक्ती होणे ही केवळ नोकरीची संधी नसून समाजसेवा, कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे. भुषण पाटील हा ही जबाबदारी समर्थपणे पार पाडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
पाचोरा शहरातील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने कठोर परिश्रमांच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना यश कधी ना कधी मिळतेच, याचे जिवंत उदाहरण म्हणजे भुषण भगवान पाटील होय.
Comments
Post a Comment