सातगाव येथे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी पिस्तूलासह आरोपी जेरबंद
पाचोरा तालुक्यातील सातगाव परिसरात पिंपळगाव हरे पोलिसांनी धाडसी व प्रभावी कारवाई करत एका संशयित इसमाला गावठी बनावटीच्या पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. अवैध शस्त्र बाळगून फिरणाऱ्या आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक १३ जून २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सातगाव गावाबाहेर किशोर ल. पाटील (वय ३२, रा. सारवे पिंप्री, ता. पाचोरा, जि. जळगाव) हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने कमरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे. माहितीची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी पोहेकॉ अतुल पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता संबंधित इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून अंदाजे २० हजार रुपये किंमतीचे मॅगझीनसह गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.
या प्रकरणी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहेरे, अमोल पाटील, प्रमोद वाडीले व नामदेव इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांनी उघडलेली ही मोहीम गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रभावी इशारा देणारी ठरत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Comments
Post a Comment