तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान रविवारी
राजेंद्र खैरनार (पाचोरा) मुख्य संपादक सत्य शोध न्यूज
पाचोरा : श्रद्धेय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंतरराष्ट्रीय व्याख्याते तथा ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन रविवार, दि. 7 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवतीर्थ, जय किसान कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथे करण्यात आले आहे. यापूर्वी हा कार्यक्रम दि. 28 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता नव्या तारखेनुसार हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम होणार असल्याने परिसरातील युवक, नागरिक आणि विचारप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारत हा तरुणाईचा देश असून देशाची खरी ताकद केवळ लोकसंख्येत नसून तरुणांच्या विचारांमध्ये रुजलेल्या संस्कृती, संस्कार आणि मूल्यांमध्ये आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, विज्ञान आणि नव्या संधींच्या दिशेने वाटचाल करणारी आजची तरुण पिढी देशाच्या विकासाची प्रमुख शक्ती आहे. या तरुणाईला भारतीय संस्कृती, राष्ट्रहिताचे विचार, आदर्श जीवनमूल्ये आणि संस्कारांची दिशा मिळाल्यास भारत केवळ आर्थिक महासत्ता नव्हे तर विचार, संस्कार आणि मानवतेच्या क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करू शकतो, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
याच उद्देशाने लाखो युवकांच्या विचारांना दिशा देणारे ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती, सामाजिक जबाबदारी, युवकांची भूमिका आणि वर्तमान राष्ट्रीय घडामोडींवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
सध्या जून महिना हा पावसाळ्याचा कालावधी असल्याने रविवार, दि. 7 जून 2026 रोजी पाऊस झाल्यास कार्यक्रमाचे स्थळ बदलून स्वामी लॉन्स, पाचोरा येथे करण्यात येईल. त्यामुळे उपस्थित नागरिक, विद्यार्थी, युवक व श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment