"अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे श्रीमद् भागवत कथा महोत्सवाचा शुभारंभ; भव्य शोभायात्रेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग"
राजेंद्र खैरनार(पाचोरा) मुख्य संपादक सत्यशोध न्यूज
पाचोरा प्रतिनिधी :
अग्रवाल समाज महिला मंडळ, पाचोरा यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा महोत्सवाला रविवारी भव्य शोभायात्रेने उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. प्रख्यात भागवताचार्य भक्ती सुमन गोविंदजी महाराज यांच्या उपस्थितीत रथ गल्लीतील देवी मंदिर येथून निघालेल्या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
ही शोभायात्रा गांधी चौक, जामनेर रोड, तलाठी कार्यालय मार्गे कृष्णापुरी परिसरातील विठ्ठल मंदिर येथे पोहोचली. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
अग्रवाल समाज महिला मंडळाच्या वतीने ७ ते १३ जून दरम्यान कृष्णापुरी येथील विठ्ठल मंदिरात श्रीमद् भागवत कथाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भागवताचार्य भक्ती सुमन गोविंदजी महाराज यांचे महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार व सत्कार करून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष रमेश मोर, सुनील मोर, ललित पटवारी, अग्रवाल नवयुवक मंडळाचे अध्यक्ष गिरीश मोर, महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मला पटवारी तसेच अग्रलक्ष्मी बहु मंडळाच्या अध्यक्षा सोनल अग्रवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी परिसरातील नगरसेवक अशोक आप्पा पाटील यांनीही सहकार्य केले. यावेळी पत्रकार, प्रा. सी. एन. चौधरी, शिवाजी शिंदे यांच्यासह सर्वधर्मीय भाविक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment