परराज्यातील दोन कोटींच्या अमली पदार्थ प्रकरणातील फरार आरोपी पाचोऱ्यात जेरबंद; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी


राजेंद्र खैरनार(पाचोरा)मुख्य संपादक, सत्य शोध न्यूज
पाचोरा : कायद्यापासून कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी गुन्हेगारांना अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकावेच लागते, याची प्रचिती पुन्हा एकदा पाचोरा पोलिसांनी दिली आहे. राजस्थान राज्यातील दोन कोटी रुपयांच्या अफू (अफीन) मादक पदार्थ प्रकरणात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाचोरा शहरातून ताब्यात घेऊन राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या कारवाईमुळे पाचोरा पोलिसांच्या दक्षता, गुप्त माहिती संकलन आणि समन्वय क्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील सरणा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 11/2024 मधील फरार आरोपी गोविंद शंभूनाथ (वय 27, रा. बनका खेडा, ता. कोठली, जि. भिलवाडा, राजस्थान) हा पाचोरा शहरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील आणि गणेश कुवर यांनी अत्यंत शिताफीने तपास करून आरोपीचा शोध घेतला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत राजस्थान पोलिसांच्या हवाली केले.
सदर आरोपीवर अजमेर आणि चित्तौडगड परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला पकडण्यात यश आले असून, त्यामुळे परराज्यातील पोलिसांनाही मोठी मदत झाली आहे.
गुन्हेगार कितीही चतुराईने लपण्याचा प्रयत्न करत असला तरी पोलिसांची दक्षता आणि जनतेच्या सहकार्यामुळे त्याला कायद्याच्या कचाट्यात यावेच लागते, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पाचोरा पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे राजस्थान पोलीस दलासह स्थानिक नागरिकांनीही त्यांचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.
ही कारवाई केवळ एका आरोपीच्या अटकेपुरती मर्यादित नसून, गुन्हेगारांसाठी कायद्याचा धाक कायम असल्याचा ठोस संदेश देणारी ठरली आहे. पाचोरा पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, कर्तव्यनिष्ठ पोलिसांबद्दलचा विश्वासही अधिक बळकट झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद